मुंबई : आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची जाहीरपणे माध्यमांसमोर येऊन माफी मागितल्यानंतर आता प्राजक्ता माळीनेही सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर आपल कुठलीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच,आमदार सुरेश धस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून जाहीरपणे माफी मागितल्यानंतर दादा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात, असे म्हणत प्राजक्ताने सुरेश धस यांच्याबद्दलही चांगले उद्गार काढले आहेत. त्यामुळे, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वेगळ्याच वादाचं तोंड फुटलेला प्राजक्ता माळी-सुरेश धस यांच्या वादाचा मुद्दा आता संपुष्टात आला आहे. दरम्यान, आमदार धस यांनी भाजप नेत व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवर झालेल्या संवादानंतर व्हिडिओच्या माध्यमातून प्राजक्ता माळीची जाहीरपणे माफी मागितली होती. त्यानंतर, आता प्राजक्ता माळीनेही (Prajakta mali) धस यांच्यावर कुठलाही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वी धस यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. 


आमदार सुरेश धस यांनी अत्यंत मोठ्या मनाने घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. दादा, तुम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंय. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती, हे आपण सगळे जाणतो. ही छत्रपतींची भूमी आहे, आणि इथे छत्रपतींचे विचार पुढे चालवले जातात हेच तुम्ही ह्या कृतीतून दाखवून दिलंय, असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे आभार मानले आहेत. 


तसा माझा कोणताही हेतू नव्हता


आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्याने मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. माझ्या बाजूने या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकते. आम्ही व्यक्त झालो की आमच्यावर टोळ धाड पडते, असे म्हणत प्राजक्ताने खंतही व्यक्त केली आहे. कुठलंही आंदोलन, कुठलाही मोहीम, कुठलाही मोर्चा डायव्हर्ट करण्याचा माझा हेतू नव्हता. आमदार धस हे बोलले नसते तर मलाही अशाप्रकारे हे काही करायची गरज नव्हती, असे स्पष्टीकरण प्राजक्ता माळीने दिले आहेत. त्यामुळे, आमदार धस आणि प्राजक्ता माळी यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. 


सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त


प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटलं. दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले. 


हेही वाचा


Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?