मुंबई : स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' या निवासस्थानी आढावा बैठक बोलावली होती. उद्धव यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शिवसेनेच्या उपस्थित खासदारांनी मात्र मौन बाळगल्याची माहिती आहे.

'मातोश्री'वर आयोजित बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ शिंदे, आमदार दिवाकर रावते, आमदार रामदास कदम आणि चंद्रकांत खैरै, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने असे चार खासदार होते.

खासदारांच्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे स्वबळाचा आढावा घेताना खासदार मौन बाळगून असल्याची माहिती आहे. आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती असेल? असा सवालही उद्धव ठाकरेंनी खासदारांना विचारला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढेल, असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मात्र 'एबीपी न्यूज' आणि सीव्होटरच्या सर्वेक्षणानुसार स्वबळाचा शिवसेनेला जबर फटका बसू शकतो. एनडीएच्या जागा तर कमी होतीलच, मात्र शिवसेनेच्या वाट्यालाही राज्यात अवघ्या दोन जागा येण्याचा अंदाज आहे.