मुंबई : उकाड्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. शनिवारचा दिवस हा गेल्या दोन वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरला.

ऑक्टोबर हीटमुळे मुंबईतील तापमान कमालीचं वाढलं आहे. शनिवार 6 ऑक्टोबर रोजी पारा 37.2 अंश सेल्सिअसवर पोहचला होता. नेहमीपेक्षा हे तापमान पाच अंश सेल्सिअसने अधिक होतं.

2016 पासून ऑक्टोबर महिन्यात नोंदवलं गेलेलं हे सर्वोच्च तापमान ठरलं. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबरला 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती, तर 21 ऑक्टोबर 2016 ला तापमान 35.5 अंशांवर होतं.

मुंबईतून नैऋत्य मोसमी वारे गेल्यामुळे तापमानात वाढ झाल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितलं. पुढील दोन दिवस तापमानवाढीची शक्यता असून त्यानंतर पारा उतरेल, असा अंदाज वर्तवला आहे.