मुंबई : पूजा मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडली, त्यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. परंतु, कॅबिनेटच्या बैठकीत संजय राठोड प्रकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती मिळाली परंतु, कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. सध्या वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला; शरद पवारांची नाराजी


गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात वादंग सुरु आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. परंतु, आज पोहोरादेवी येथे संजय राठोड यांनी जे शक्तीप्रदर्शन केलं ते संजय राठोड यांना आवडलं नसल्याची माहिती मिळत आहे. संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचं शरद पवार यांचं मत आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, अशी शरद पवार यांची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.


एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रम करू नये, असं आवाहन केलं असताना संजय राठोड यांनीच शक्तिप्रदर्शन केलं. आज सांध्याकाळी शरद पवार हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तेव्हा याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकूणच संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेलं राजकारण घाणेरडं, चौकशीतून सत्य समोर येईल : संजय राठोड


पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं.


पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करु नका अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :