मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा आज महामोर्चा आहे. या मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात असून मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. भाजपला नेहमीच इतर पक्षांच्या कुबड्या लागतात, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली आहे.
मनसेच्या या मोर्चामुळे शिवसेनेला काहीही फटका बसणार नाही. लोकांना आता कळालं आहे की, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्याची भूमिका कुणाची होती. बाळासाहेब ठाकरे यांची ही विचारसरणी आहे, त्याची कॉपी केली जात आहे. मात्र यांना हे आताच का आठवत आहे. मनसेची स्थापना होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. हे मुद्दे आधी का आठवले नाहीत, असा प्रश्नही मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला.
मनसेचा महामोर्चा, मुंबईतील नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर आणि भगवे झेंडे
राज ठाकरे यांच्या आझाद मैदानातील सभेच्या व्यवस्थेची वैशिष्ट्य ?
राज ठाकरे आझाद मैदानात ज्या मंचावरुन आज भाषण करणार आहेत, त्यावर 'पाकिस्तानी-बांगलादेशीयांनो, चले जाव' असा एका ओळीचा संदेश देत राज ठाकरे यांचे छायाचित्र असणारा कट आऊट लावण्यात आला आहे. मंचाच्या दोन्ही बाजूला मनसेचा राजमुद्रा असलेले झेंडे तर मध्यभागी देशाचा तिरंगा फडकवला जाणार आहे. भव्य मोर्चा असूनही सभास्थळी तुरळक खुर्च्या आहेत, कारण सर्व पदाधिकारी जमिनीवर बसणार असून फक्त ज्येष्ठ नागरिक खुर्चीवर बसणार आहेत. सभेला भारतीय बैठकीचा नवा पायंडा मनसे पाडताना दिसत आहे. मंचावर इतर महापुरुषांसह स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटोही लावण्यात येणार आहे.