मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा होणार आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर तयारी सुरु तर नाशिकमधून 10 हजार झेंडे मुंबईकडे रवाना केले आहेत.


पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक आणि राज्यभरातल्या इतरही प्रमुख शहरात मनसेची जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर लागले आहेत. रस्ते आणि उड्डाणपूल मनसेच्या झेंड्यांनी भगवे झाले आहेत.

मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्य़ेक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे.



मनसेच्या मोर्च्यासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बँडही तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या मोर्च्यात मनसैनिकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसणार आहे. भगव्या रंगातल्या या टोपीवर राजमुद्रा आणि मनसेची निशाणी छापण्यात आली आहे.

दुसरीकडे नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनीही जय्यत तयारी केली आहे. त्यांनी 10 हजार झेंडे तयार केले आहेत. शिवमुद्रा असलेले झेंडे कार्यकर्त्यांना दिले जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी अँम्ब्युलन्सचीही तयारी केली आहे. पुण्यातूनही हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता हिंदू जिमखान्यापासून मोर्चा सुरु होणार आहे. कार्यकर्त्यांसाठी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान मोर्च्याच्या आधी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केलाय. प्रकाश महाजनांनीही मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरेंनी याआधीही रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता. पण यावेळचा मोर्चा हा सुनियोजित आहे. पक्षाच्या बदलेल्या धोरणाची किनार या मोर्चाला आहे. त्यामुळं हा मोर्चा अभूतपूर्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.