मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रशस्त बंगला बांधायला सुरुवात केली आहे. असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे बेकायदेशीर बंगले आहेत, त्यामुळे शिवसेना म्हणजे 'बेकायदेशीर बंगलो' सेना आहे अशी टीकाही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.


मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसात होणार आहे असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. 


याच समुद्रावर अनिल परब यांच्या पासून काही फूटाच्या अंतरावर मिलिंद नार्वेकर यांनी 72 गुंठा जागा खरेदी केली. त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.


बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उत्खनन ही सुरु आहे.  या संबंधी महाराष्ट्र सरकारचे पर्यावरण सचिव व महाराष्ट्र तटीय नियमन क्षेत्र (CRZ) च्या अध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर यांना भेटून तक्रार केली आहे असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं. 
 
या आधी समोरचा मुरुड (अलिबाग) येथे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावावर अशाच प्रकारचे बेकायदेशीररित्या 19 बंगले विकत घेतले आहेत असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.


भाजप नेते  किरीट सोमय्या म्हणाले की, "शिवसेनेचे दुसरे नेते रविंद्र वायकर यांनी देखील आपल्या पत्नीच्या नावाने 19 बंगले अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतले. एका बाजूला कोविडमध्ये लोक मृत्युमुखी पडतायेत आणि त्याच वेळेला शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे कोविडच्या लॉकडाऊन काळात भव्य रिसॉर्ट, भव्य बंगले बांधतात. या प्रकरणाची सीबीआय द्वारा चौकशी करावी आणि अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर कारवाई करावी." 


महत्वाच्या बातम्या :