Sanjay Raut : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने आभार मानावे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मागासवर्गीय असल्याने भेदभावपूर्ण आणि मानवी हक्क नाकारले जात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील एक सीसीटीव्ही फूटेज ट्वीट केले आहे.


संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागले असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी म्हटले. 


पोलीस आयुक्तांच्या ट्वीटनंतर जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप खोटा असल्याचे समोर आले असल्याचे राऊत यांनी म्हटले.  राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं असून त्यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली. दरम्यान, आपण कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिली नसल्याचे राऊत यांनी सांगितले. राणा दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.


सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात; संजय राऊतांचा टोला


आमच्या हातातली हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटेल, असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचं (Hanuman Chalisa) पठण करावं, त्यांच्या मनाला शांती मिळेल असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबत किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.