Mumbai Local Update : मुंबईत पश्चिम रेल्वेची (Western Railway) लोकल (Mumbai Local) वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल अशी माहिती, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.
पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तेव्हापासून कोणतीही लोकल जलद मार्गावरुन चर्चगेटच्या दिशेनं सोडण्यात आलेली नाही. याचाच परिणाम स्लो मार्गावरील वाहतूकीवर झाल्याचंही दिसून येत आहे. कारण जलद मार्गावरील काही गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
चर्चगेट म्हणजे, मुंबईतील महत्त्वाचा परिसर. चर्चगेट आणि लगतच्या परिसरात अनेक मोठमोठी कार्यालयं आहेत. मुंबई आणि उपनगरांतून अनेक लोक या परिसरात नोकरीसाठी दररोज लोकलनं ये-जा करत असतात. अशातच सकाळच्याच वेळी ही घटना घडल्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दहिसर ते बोरिवली दरम्यान, प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यासोबतच विरार, वसई, नालासोपारा या स्थानकांतही प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अद्याप लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आजपासून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ
मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ झाली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ही दरवाढ आजपासून 23 मे 2022 दरम्यानच्या 15 दिवसांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत 10 रुपयांऐवजी 50 रुपये इतकी असणार आहे. एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या 332 घटना घडल्या. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.