Sanjay Raut On Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरू केली आहे. 'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊत यांनी मागील दोन-तीन दिवसांपासून सोमय्यांच्या भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला एनएसईएल घोटाळा प्रकरणात चौकशी झालेल्या एका कंपनीकडून देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सोमय्यांवर आरोप करताना म्हटले की, एनएसईएलमध्ये 5600 कोटींचा घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांनी चौकशीची मागणी केली होती. मोतीलाल ओस्वाल या कंपनीच्या शिपयाच्या घरी जात सोमय्या यांनी तमाशा केला. या प्रकरणाची ईडीनेदेखील चौकशी केली. मात्र, त्यानंतर 2018-19 मध्ये किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओस्वाल कंपनीकडून लाखोंची देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
मंगळवारीदेखील संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधताना मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी सोमय्यांवर आरोप केले होते. कोलकातामधील मेट्रो डेअरी घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र, या मेट्रो डेअरीने सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंची देणगी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
मंगळवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा नारा देणारेच सर्वात मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सोमय्यांची चौकशी करावी असेही संजय राऊत यांनी म्हटले. सोमय्यांचा भ्रष्टाचारविरोधाचा मुखवटा उतरला असून त्यांनी 150 हून अधिक कंपन्यांकडून आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी पैसे घेतले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.