मुंबई : 'फडणवीस सरकार म्हणजे सगळंच आलबेल', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. कमला मिल अग्नितांडव आणि आयुक्ताचं राजकीय दबावाचं वक्तव्य यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांना 'सामना'च्या अग्रलेखातून चिमटे घेण्यात आले आहेत.

'कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतरही मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था चोख आहे. पण कमला मिल अग्नितांडवाचे आरोपी अद्यापही मोकाट आहेत. तसेच आयुक्तांवर दबाव आणणारे कोण? यांचंही उत्तर जनतेला मिळावं.' अशा शब्दात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

एक नजर 'सामना'च्या अग्रलेखावर :

* भीमा-कोरेगावच्या हिंसक व बेकाबू झालेल्या दंगलीनंतरही मुख्यमंत्र्यांनी आत्मविश्वासाने बजावले आहे, ‘‘महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, चिंतेचे कारण नाही. ’’आम्हालाही त्याचा आनंदच आहे, पण कमला मिल कंपाऊंड जळितकांडाचे गुन्हेगार अद्याप मोकाट कसे व आयुक्तांवर दबावाचे ‘राजकीय’ दडपण कोण आणीत आहेत याचे उत्तर तेवढे राज्याच्या जनतेला मिळावे. बाकी सरकार म्हणते आहे म्हणजे सगळे आलबेल असणारच!

* कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीचा लोळ विझला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धूर निघत आहे. या धुरात राजकीय फुंकण्याच जास्त फुंकल्या जात आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे व ही चौकशी ‘शांतता, कोर्ट चालू आहे’च्या धर्तीवर ‘शांतता, चौकशी चालू आहे’ अशा पद्धतीची नाही हे एव्हाना लक्षात आले असेल. ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस’तील आगीने १४ निरपराध्यांचा बळी घेतला त्यानंतर कमला मिल कंपाऊंडच नव्हे, तर मुंबईतील पाचशेच्या आसपास हॉटेल-रेस्टॉरंटच्या अनधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्तांचा हातोडा पडला. ‘शांतता, कारवाई जोरात सुरू आहे’ असा एक थरारक प्रयोग पुढच्या ७२ तासांत मुंबईकरांनी अनुभवला. आता कुणाचीही गय करणार नाही असा आवाज मुख्यमंत्र्यांनी दिल्यावर मग ‘हयगय’ ती कसली? पण तरीही ‘वन अबव्ह’चे मालक हे त्या भयंकर दुर्घटनेपासून ‘फरारी’ झाले आहेत व त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी म्हणजे सरकारने एक लाखाचे बक्षीस जाहीर करून मृतांची खिल्ली उडवली आहे. पोलिसांकडून तीन फरारी आरोपींची छायाचित्रे व माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे सरकारने या आरोपींना शोधण्याची जबाबदारी जनतेवर टाकली आहे. पोलिसांनी फरारी आरोपींच्या जाहिराती प्रसिद्ध करताच युग पाठक हा आरोपी म्हणे पकडला गेला. पाठक हा निवृत्त बड्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा. त्यामुळे कायद्याची बूज राखत तो ‘हजर’ झाला की त्यास नक्की बेड्या पडल्या हा शोधाचा विषय आहे.

* अनेकदा राजकीय विरोधकांची नालबंदी करण्यासाठी व ‘वाल्यां’ना मदत व्हावी म्हणून मंत्री-मुख्यमंत्री पोलीस ठाण्यात फोन करीत असतात, पण कमला मिल जळितकांडातील आरोपी मात्र फरारी झाले. ‘मोजोस’ किंवा ‘वन अबव्ह’सारख्या पब्जनी केलेल्या बेकायदेशीर कामांचा पंचनामा आता झाला आहे, पण या पंचनाम्यानंतर ‘पोस्टमार्टेम’ करीत असताना पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यावर राजकीय दबाव आल्याची कबुली स्वतः त्यांनीच दिली. आयुक्तांनी गौप्यस्फोट केला, पण त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला. मुंबईतील किमान १८ ते २० मोठ्या हॉटेलांवर कारवाई करू नये यासाठी हा राजकीय दबाव होता. हा नुसता दबाव नव्हता तर राजकीय दबाव होता. आता ज्यांच्या हाती सत्तेची व आदेश देण्याची ‘सूत्रे’ आहेत ते जेव्हा ‘दबाव’ वगैरे टाकतात त्यास राजकीय दबाव म्हणण्याची प्रथा आहे. आयुक्त थेट सरकारचे दूत असतात व ते सरकारचेच आदेश ऐकतात. अर्थात कितीही दबाव आले तरी मी ऐकणार नसल्याची भूमिका आयुक्तांनी घेतल्यामुळे मुंबईकर निर्धास्त आहेत.

* या सगळय़ा प्रकरणामुळे अनेकांचे मुखवटे गळून पडले व कित्येकांचे पितळही उघडे पडले आहे. पारदर्शकतेच्या कुणी कितीही गप्पा मारल्या तरी प्रत्येकाचे पाय मातीत आहेत व तेवढ्यांचेच हात दगडाखाली अडकले आहेत. कमला मिल कंपाउंड जळितकांड हा एक निर्घृण प्रकार आहे, पण त्या हत्याकांडातील आरोपी फरारी आहेत व मिलच्या जागा उलटसुलट पद्धतीने विकून खाणारा मालक गोवानीही मोकळा आहे. गोवानी व त्या तीन आरोपींना वाचवणाऱ्यांनीच आयुक्तांवर राजकीय दबाव आणला आहे काय हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. पालिका आयुक्त त्यांचे काम चोख बजावीत आहेत. पोलीस आयुक्तांनीही कोणत्याही दबावाची पर्वा करू नये.

संबंधित बातम्या :

कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा : उद्धव ठाकरे

कमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल