नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात आज शिवसेना नगरसेवकांनी चांगलाच राडा केला. परिवहन समिती सदस्य निवडणुकीवरून शिवसेनेने गोंधळ करत महापौर जयंत सुतार यांच्या अंगावर पेपर फाडून फेकले. यावेळी समोर ठेवलेला राजदंड पळवून सभागृहाबाहेर नेला.


आज परिवहन समितीच्या सदस्यांची होणार निवड होती. 2007 पासून परिवहन समितीवर निवडून आलेल्या राजकीय पक्षाच्या नगरसेवक संख्येच्या आधारावर सदस्य घेतले जात होते. यानुसार आज झालेल्या परिवहन सदस्य निवडणुकीत शिवसेना 2 राष्ट्रवादी 4 सदस्य निवडून जाणार होते.

मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीने नगरसेवकांच्या संख्येवर विरोधी पक्षाला प्रतिनिधीत्व न देता सरळ हात वर करून निवडणूक घेतली. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे शिवसेनेचे दोन सदस्य परिवहन समितीवर जावू शकले नाहीत.

यामुळे संतापलेल्या सेनेने सभागृहात राडा करीत महापौरांच्या अंगावर कागदपत्रं फेकली. आयुक्तांच्या समोर ठेवलेला राजदंड सभागृहाबाहेर पळवला. राष्ट्रवादीने हुकूमशाही पध्दत सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर आपण कायद्याच्या कसोटीत निवडणूक घेतल्याचा खुलासा सत्ताधारी राष्ट्रवादीने केला आहे.