कल्याण : अंबरनाथमध्ये रिक्षा स्टॅण्डवर झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून पाच रिक्षाचालक जखमी झाले आहेत.


अंबरनाथ पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या शिवाजी चौकात हे रिक्षास्टॅण्ड आहे. काल रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेलं एक मोठं गुलमोहराचं झाड या रिक्षास्टॅण्डवर कोसळलं. यामुळे मोठ्या विजेच्या ताराही रिक्षांवर कोसळल्या आणि शॉक लागून विष्णू सोळंके या 22 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. तर अन्य ५ रिक्षाचालक जखमी झाले.


जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. मृत रिक्षाचालक विष्णू याला आठ महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे. दरम्यान, जे झाड कोसळलं, ते कापण्याबाबत आपण अनेकदा महावितरणकडे पाठपुरावा केला होता, मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप रिक्षा संघटनेनं केला आहे.


त्यामुळे आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, आणि रिक्षाचालकांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोवर रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा संघटनेनं घेतलाय. यामुळं प्रवाशांचे मात्र हाल होतायत.