महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेला सगळ्यात महत्वाची असणारी महापालिका म्हणजे मुंबई महापालिका. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेत आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेना ताकद लावणार आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष देखील एकत्र असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मुंबईत कधीच वाढला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध पाहता मुंबईत राष्ट्रवादीने कधीच ताकद वाढवली नाही. किंबहुना राज्यात आघाडी सरकार सत्तेत आणि मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता अबाधित असणं हे देखील समीकरण राहिलंच आहे.
राष्ट्रवादीची देखील जोमाने तयारी
मुंबईत राष्ट्रवादीचे मोठे चेहरे म्हणजे सचिन अहिर, नवाब मलिक, संजय दीना पाटील. 2019 विधानसभा निवडणुकीआधी सचिन अहिर यांनी तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर असताना शिवसेनेत प्रवेश केला. नंतर संजय दिना पाटील यांनीही साथ सोडली. नवाब मलिक यांना मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आणि त्यांनी आपली जागा निवडून आणली. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार नवाब मलिक आहेत. अशा वेळी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढवत असताना राष्ट्रवादी पक्षाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
आतापर्यंत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त 14 तर कमीत कमीत 9 नगरसेवक निवडून आले होते. मुंबई महापालिका हा महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने तिन्ही पक्षांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
2017 मध्ये राज्यात युतीचं सरकार असतानाही मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजपशी युती तोडली आणि स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपने मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली. शिवसेनेसाठी ही तेव्हाच धोक्याची घंटा होती. त्यामुळे 2022 ला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला आपली सत्ता अबाधित ठेवावी लागेल आणि त्यासाठी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही मदत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने मुंबईत एक मार्च रोजी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत पक्ष उभारण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षात मुंबईत मोठे चेहरे नाहीत तसेच कार्यकर्त्यांची फळी नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपात ज्या जागा मिळतील, त्या जागांवर जिंकून येणारे उमेदवार शोधावे लागतील. मुंबईत नेत्यांची फळी उभी करावी लागेल. त्यासाठी आतापासून तयारी केली तर मुंबई महापालिकेत पक्षाला उभारी मिळू शकेल.
त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या या एकदिवसीय शिबिरानंतर पक्ष मुंबईत उभा राहील का आणि निवडणुकीत त्याची ताकद किती दिसेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.