1966 साली भूमिपुत्रांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. 1968 साली मुंबई महापालिकेत 140 सदस्यांच्या सभागृहात 42 जागा जिंकत शिवसेना प्रमुख विरोधी पक्ष बनला. त्यावेळी त्यांनी प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी केलेली युती फक्त 2 वर्ष टिकली. 1972 साली शिवसेनेनं रिपब्लिकन पक्षच्या रा.सु. गवई गटसोबत आणि मुस्लिम लीगशी युती केली. ही युतीदेखील फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपुरतीच होती.
1974 मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर होता. सत्तेत कायम राहण्यासाठी आणि संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसशीही युती केली. 1976 ते 1978 या तीन वर्षांमध्येही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती. याच दरम्यान शिवसनेनं दलित पँथरसोबतही काही काळासाठी युती केली. पुढे 1980 साली सेनेनं काँग्रेसचा हात सोडला आणि एकला चलो रे चा नारा दिला.
1980 नंतर जवळपास दहा वर्ष शिवसेनेनं स्वबळावर निवडणुका लढल्या. मात्र, 1989 साली सेनेनं हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतला आणि त्याच्याच आधारावर भाजपसोबत युती केली. पुढे 2014 पर्यंत दोन्ही पक्ष एकत्र होते. 2019 साली 2014 सारखं चित्र जवळपास पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुका शिवसेना भाजपनं एकत्र लढवल्या. विधानसभेतही 'हो-नाही, हो-नाही' करत युती झाली. मात्र, निकाल लागताच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावर दावा केला. त्यालाच पुरेपूर साथ दिली ती संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांनी. आणि सामनातील अग्रलेखांनी.
मात्र, भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नव्हतं. त्याच काळात संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवाराच्या बैठकांनी सेना-भाजपमध्ये आणखी दुरावा आणला. अखेर, भाजपनं सत्ता स्थापण्यास नकार दिला आणि सत्तेचा चेंडू सेनेच्या कोर्टात आला.
आता आकड्यांच्या जुळवाजुळवीची समीकरणं गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्र पाहतोय. आता अखेर, शिवसेनेनं आणखी एक युती केली. आणि यावेळी त्यांच्यासोबत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आणि त्याचं नाव आहे महाविकास आघाडी.