Shivram Bhandari Life: काही लोकांचं आयुष्य खडतर प्रवासानं व्यापलेलं असतं. पण काही लोकं या खडतर रस्त्यावरुन पुढे जात आपलं आयुष्य सुंदर करतात आणि अविश्वसनीय यश मिळवतात. अशीच एक स्टोरी आहे हेअर स्टायलिश सेलिब्रेटी शिवराम भंडारी यांची. आज ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगताना ते कमालीचे भावूक झाले. 


माझा कट्ट्यावर बोलताना भंडारी म्हणाले की, दारिद्य्र आणि अपमान यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला शिवराम भंडारी पुढे चालून बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर-स्टाइलिस्ट होईल, शिवाज् या नावाने मुंबईत स्वतःच्या सलॉन्सची शृंखला निर्माण करेल, असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं, असं शिवराम भंडारी यावेळी म्हणाले.  लहानपणापासून भोगलेल्या यातना आणि घेतलेले कष्ट माझ्या समोर येतात आणि मला काम करायला अजून बळ मिळतं असंही ते म्हणाले.  


यावेळी आईची आठवण काढताना ते खूप भावूक झाले. माझ्या आईमुळं मी आज इथं आहे. माझ्या सगळ्या प्रवासात ती माझ्या सोबत होती. तिच्या हातून मी काही सलूनचं उद्घाटनही केलं. माझी आई माझी प्रेरणा होती. ती जास्त शिकलेली नव्हती पण तिनं मला घडवलं, असं भंडारी म्हणाले. 


त्यांनी सांगितलं की, कर्नाटकातील डोंगराळ गावात न्हाव्याच्या दुकानात काकांना मदत करायचो. नंतर मुंबईत आलो, मिळेल ते काम केलं.  संयुक्त अरब अमिरातीच्या कतारमध्ये  जगातील विविध भागातून येणाऱ्या खेळाडूंची हेयर स्टाइल एक्सपोज केली. नंतर त्यांनी दोन नामांकित संस्थां विदाल ससून आणि टोनी एंड गाई कडून हेयरस्टाइलमध्ये हाय-फॅशनचा अभ्यास केला, असं त्यांनी सांगितलं.  


त्यांनी म्हटलं की, आपल्या क्षेत्रात मोठे होण्याची स्वप्ने घेऊन मुंबईत आलो आणि 80 दशकाच्या मध्यावर मुंबईच्या उपनगरी ठाण्यात एका लहान नाईच्या दुकानातून सुरुवात केली. आज माझ्याकडे शिवाज नावाच्या ब्रांड नावाने 23 सलून आणि स्पा, बीस्पोक सैलून आणि अनेक कॉस्मेटिक उत्पादनांची मालकी आहे. शहरात पसरलेल्या शिवाजच्या आउटलेट्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉरपोरेट विश्वातील मान्यवरांची गर्दी असते, असं सांगताना त्यांचा ऊर भरुन आला होता.  


त्यांनी सांगितलं की,  बाळासाहेबांच्या कटिंगसाठी मला घेऊन गेले. त्यांची कटिंग मी केली. ते माझ्याशी मराठीत संवाद साधायचे. कटिंग केल्यानंतर मला ते म्हणायचे तू खूप छान काम करतोस. मला त्यांचे फोन यायचे, असंही शिवराम भंडारी यांची सांगितलं. बाळासाहेबांची कटिंग किंवा स्टाईल करणं फार अवघड वाटायचं. तिथं चूक झाली तर काय होईल याची भीती वाटायची.


आज उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अमृता फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची हेअर स्टाईल शिवराम भंडारीच करतात. अमिताभ बच्चन यांनी शिवाज सैलूनचे प्रसिद्ध हेयर स्टाइलिस्ट शिवराम के. भंडारी यांचे पुस्तक प्रकाशित केले होते.