Shivram Bhandari Life: काही लोकं  खडतर रस्त्यावरुन पुढे जात आपलं आयुष्य सुंदर करतात आणि अविश्वसनीय यश मिळवतात. अशीच एक स्टोरी आहे हेअर स्टायलिश सेलिब्रेटी शिवराम भंडारी यांची. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यापासून ते बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबतचे किस्से सांगितले. आज ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगताना ते कमालीचे भावूक झाले. 


त्यांनी सांगितलं की, बाळासाहेबांच्या कटिंगसाठी मला घेऊन गेले. त्यांची कटिंग मी केली. ते माझ्याशी मराठीत संवाद साधायचे. कटिंग केल्यानंतर मला ते म्हणायचे तू खूप छान काम करतोस. मला त्यांचे फोन यायचे, असंही शिवराम भंडारी यांनी सांगितलं. मला बाळासाहेबांनी एकदा बोलावलं आणि म्हणाले की, कुणीतरी अवार्ड जिंकलेला हेअर स्टायलिश आला अन् माझ्या केसांची वाट लावून गेला. तू आता कुठं जाताना सांगून जा, असा किस्सा भंडारींनी सांगितला.  बाळासाहेबांची कटिंग किंवा स्टाईल करणं फार अवघड वाटायचं. तिथं चूक झाली तर काय होईल याची भीती असायची. आज उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अमृता फडणवीस, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांची आणि सेलिब्रिटींची हेअर स्टाईल शिवराम भंडारीच करतात. 


एवढ्या मोठ्या लोकांच्या इतक्या जवळ जातो पण मला कधी भीती नाही वाटत, माझा माझ्या कामावर विश्वास आहे, असं भंडारी यांनी सांगितलं.


त्यांनी सांगितलं की, कर्नाटकातील डोंगराळ गावात न्हाव्याच्या दुकानात काकांना मदत करायचो. नंतर मुंबईत आलो, मिळेल ते काम केलं. नंतर संयुक्त अरब अमिरातीच्या कतारमध्ये  जगातील विविध भागातून येणाऱ्या खेळाडूंची हेअर स्टाइल एक्सपोज केली. नंतर दोन नामांकित संस्था विदाल ससून आणि टोनी एंड गाई कडून हेयरस्टाइलमध्ये हाय-फॅशनचा अभ्यास केला, असं त्यांनी सांगितलं.  


त्यांनी म्हटलं की, आपल्या क्षेत्रात मोठे होण्याची स्वप्ने घेऊन मुंबईत आलो आणि 80 दशकाच्या मध्यावर मुंबईच्या उपनगरी ठाण्यात एका लहान नाईच्या दुकानातून सुरुवात केली. आज माझ्याकडे शिवाज नावाच्या ब्रांड नावाने 23 सलून आणि स्पा, बीस्पोक सलून आणि अनेक कॉस्मेटिक उत्पादनांची मालकी आहे. शहरात पसरलेल्या शिवाजच्या आउटलेट्समध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉरपोरेट विश्वातील मान्यवरांची गर्दी असते, असं सांगताना त्यांचा ऊर भरुन आला होता.  कामाला पर्याय नाही, मी फक्त आणि फक्त कामाच्या बळावरच इथवर पोहोचलो आहे त्यामुळं वेळेकडे न पाहता कामावर श्रद्धा ठेवा अन् मन लावून काम करा, आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. 


ही बातमी देखील वाचा


Shivram Bhandari: कैचीनं केलं कोट्यधीश! हेअर स्टायलिश शिवराम भंडारी यांचा अद्भुत प्रवास, माझा कट्ट्यावर झाले भावूक