Shiv Sena MP Sanjay Raut Bail Granted : तब्बल 100 दिवसांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊतांना जामीन मंजूर होताच, शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. कोर्टरुमच्या बाहेरही टाळ्यांचा कडकडाट झाला. अशातच जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आता मी पुन्हा लढेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. 


संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टानं निकाल दिला. त्यावेळी सर्वांचं लक्ष कोर्टाच्या निकालाकडे लागलं होतं. राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टा रुमबाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्यावेळी संजय राऊत मात्र याबाबत गोंधळात पडले. त्यांना काही क्षण काय झालं, हेच कळालं नाही. मग त्यावेळी त्यांच्या वकिलांनी त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती दिली. क्षणार्धातच संजय राऊतांच्या डोळ्यांत अश्रू तराळले. त्यांनी न्यायदेवतेचे आभार मानले. "आता मी पुन्हा लढेन, न्यायदेवतेचे आभार, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता.", अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. 


संजय राऊतांच्या जामीनावरील सुनावणी वेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सर्व कुटुंबीयही भावूक झाले होते. कोर्टात सुनावणी वेळी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ उपस्थित होते. सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले होते. 


जामीन मिळताच संजय राऊतांच्या मोतोश्रीही भावूक 


संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याची बातमी मिळताच त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले होते. त्यांच्या घराखाली जल्लोषाची तयारी सुरु होती. संजय राऊतांच्या मातोश्री घराच्या खिडकीपाशी येऊन सगळं पाहात होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी चिंता आता दिसत नव्हती. मात्र, डोळ्यांत आनंदाश्रू तराळले होते. 100 दिवसांपासून कारागृहात असलेला मुलगा अखेर घरी परतणार याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्या आतुरतेनं वाट पाहत होत्या. यावेळी त्यांनी एबीपी माझाला आपली Exclusive प्रतिक्रिया दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", असं संजय राऊत यांच्या मातोश्री म्हणाल्या. 


संजय राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्ट परिसरात टाळ्यांचा कडकडाट 


संजय राऊतांना जामीन मंजूर होणं, हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाहीतर संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. संजय राऊत यांना जामीन मिळताच कोर्टात देखील टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पाहायला मिळालं. इतिहासात कोर्टात पहिलांदाच असं चित्र पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडीच्या मागणीवर दुपारी 3 वाजता कोर्ट आपला निकाल देणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sanjay Raut Bail : जामीन मिळताच संजय राऊतांच्या मोतोश्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...