मुंबई : ठाकरे सरकारचं खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांचा पूर्ण सन्मान राखला आणि मंत्रीपद दिलं, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.

परंतु भाजपच्या नेत्यांनी मात्र अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव पळाला, असा उपहासात्मक टोला गिरीश बापट यांनी लगावला. तर सत्तार यांचा राजीनामा ही पतनाची सुरुवात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाहूया कोणत्या नेत्याने काय प्रतिक्रिया दिली?

सुधीर मुनगंटीवार
राज्यात सत्तेच्या खुर्चीचा खेळ सुरु आहे. सध्याच्या सरकारमध्ये रोज राजीनामास्त्र वापरलं जातं, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी, सत्तेसाठी काहीही निर्णय घेत सरकार स्थापन केलं तेथे असंच होणार होतं, असंही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील
आज दिवसभरात अशा बऱ्याच बातम्या मिळतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर केलं आहे.

अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा ही पतनाची सुरुवात आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आमच्यामुळे निवडून आले आणि सत्तेसाठी दुसऱ्या पक्षासोबत गेले. मंत्रीमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप झाले नाही. मलाईदार खात्यासाठी लढाई सुरु आहे, असंही फडणवीस म्हणाले.

गिरीश बापट
बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव पळाला, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार गिरीश बापट यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.

प्रवीण दरेकर
शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा हा महाविकास आघाडीला पहिला झटका असून असे अनेक झटके यापुढे या सरकारला सहन करावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. शिवसेना-काँग्रेसचे अनेक मंत्री आणि आमदार नाराज असून अब्दुल सत्तारांप्रमाणे अनेक मंत्री आमदार राजीनामा देतील आणि हे सरकार पडेल, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.