मुंबई/औरंगाबाद : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं. 30 डिसेंबर 2019 रोजीच ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांना भाजपमध्ये जायचं होतचं. पण स्थानिक समीकरणांमुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठवल्याची चर्चा होती. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र राज्यमंत्रीपद मिळालं. यामुळे अब्दुल सत्तार नाराज होते. परिणामी त्यांनी आज राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता सत्तार आमदाराकीचाही राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्रीमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीमध्ये विशेषत: शिवसेनेत नाराजी होती. नुकतेच पक्षात दाखल झालेल्या अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपद दिल्याने शिवसेना नेते नाराज होते. भास्कर जाधव, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवले होती. शिवाय टोकाचा निर्णय घेऊ असंही म्हटलं होतं.

दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. औरंगाबादमधील अतिथी हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली, परंतु त्यांची समजूत काढण्यात खोतकरांना यश आलं नाही. सत्तार यांची भेट घेऊन खोतकर माघारी परतले. सत्तार नाराज असल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

भाजपची प्रतिक्रिया
जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी, सत्तेसाठी काहीही निर्णय घेत सरकार स्थापन केलं तेथे असंच होणार होतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तर आज दिवसभरात अशा बऱ्याच बातम्या मिळतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

नाराज आमदार भाजपच्या संपर्कात : सूत्र
भाजप नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपच्या गोटातून वारंवार म्हटलं जात होतं की, मंत्रीमंडळ विस्तार होऊ द्या, त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कोणाला मंत्रीपद मिळतं, कोणाला नाही यानुसार नाराजांना कसं कुरवाळता येईल, त्यांना आपल्याकडे कसं घेता येईल, याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरु झालेल्या होत्या.