मुंबई : मुंबईत 5 जानेवारी रोजी सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात होणाऱ्या छात्र परिषदेला कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे. शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या संपर्क विभागाने यासंदर्भात ट्वीट केलं आहे.


मुंबईत उद्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर विरोधात छात्र परिषद होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि विद्यार्थी नेता उमर खालिद एकाच मंचावर दिसणार असल्याचं वृत्त होतं.

CAA, NRC विरोधी छात्र परिषद : आदित्य ठाकरे आणि उमर खालिद एकाच मंचावर

परंतु या वृत्तानंतर शिवसेना कम्युनिकेशनच्या ट्विटर हॅण्डलवर या कार्यक्रमाबाबत ट्वीट करण्यात आलं. या ट्वीटनुसार, "आम्हाला या कार्यक्रमाची माहिती नाही आणि युवासेनाप्रमुख, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पुष्टी केलेली नाही. कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा कार्यक्रम उपस्थितीसाठी आमच्या मध्यवर्ती कार्यालयासोबत समन्वय साधावा."


"5 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. तसंच सीएए आणि एनआरसीबाबत पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करतील," अशी माहिती छात्र भारती विद्यार्थी संघटनेते प्रवक्ते सागर भालेराव यांनी दिली होती. परंतु शिवसेनेच्या या ट्वीटनंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

मुंबईत उद्या छात्र परिषद
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 5 जानेवारी रोजी सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात छात्र परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन छात्र भारती या विद्यार्थी संघटनेने केलं आहे. या परिषदेसाठी विद्यार्थी नेता उमर खालिद, लेखक आणि कवी जावेद अख्तर, आमदार रोहित पवार, आमदार वर्षा गायकवाड, AMUSU अध्यक्ष सलमान इम्तियाज, जामिया विद्यार्थी नेते हम्मादूररहमान, सादिया शेख यांच्यासह देशभरातील विद्यार्थी नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.