Kirit Somaiya : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते, मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी मुंबईत 36 इमारती विकत घेतल्या असून एक हजार कोटींचा घोटाळा समोर आला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यानंतर जाधव यांनी बेनामी संपत्ती जमवली असल्याची चर्चा सुरू होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने यशवंत जाधव यांच्यावर टीका केली होती. किरीट सोमय्या यांनी आज ट्वीट करत जाधव यांच्यावर आरोप केले. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी 24 महिन्यात मुंबईत 1000 घर/दुकान/गाळे असलेल्या 36 बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या असून 1000 कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे असल्याचा दावा सोमय्यांनी केला.
यशवंत जाधव यांच्या या घोटाळ्याचा ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाकडून तपास सुरू असून काही दिवसात कारवाईची अपेक्षा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. यशवंत जाधव यांच्याकडे एवढी संपत्ती असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती संपत्ती असेल, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला.
चार दिवस सुरू होती छापेमारी
जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Kirit Somaiya : चला, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूयात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल