Sanjay Raut On BJP : मुख्यमंत्री नाराज असल्याची अफवा भाजपने पसरवली.  नाराज असल्याचे वृत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असणारी कारवाई ही अतिरेक्यांप्रमाणे असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज 'वर्षा' या निवासस्थानी बैठक झाली. शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने अनेकांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या बैठकीच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधला. 


संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दबावात ज्याप्रमाणे अतिरेकी कारवाया करत आहे. त्याप्रमाणे आम्ही कारवाया करणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई होईल. केंद्रीय तपास यंत्रणा ज्याप्रमाणे राज्यात घुसून बेकायदेशीरपणे विरोधकांवर कारवाई करत आहे. तसं महाराष्ट्र सरकार कारवाई करणार नाही. सूडाने कारवाई होणार नाही, राज्यात कायद्याचे सरकार असल्याने नियमांने कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपच्या अतिरेकी कारवायांना 'जशास तसे' उत्तर द्यावे असे माझ्यासह इतरांचेही मत असल्याचे त्यांनी म्हटले. ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर योग्य कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांसमोर असलेल्या विषयांवर त्यांचे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले. गृहमंत्री उत्तम काम करत आहेत. सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये कोणताही विसंवाद नाही. या नेत्यांमध्ये योग्य संवाद असून विरोधकांनी अफवा पसरवू नये असेही राऊत यांनी सांगितले.


विरोधकांनी लुडबूड करू नये


सरकारमध्ये कोणत्या पक्षाकडे, नेत्याकडे कोणती खाती असावीत याबाबत महाविकास आघाडीतील पक्ष ठरवतील. विरोधकांनी यावर मध्ये पडू नये असेही राऊत यांनी सांगितले.  आम्ही विरोधकांना त्यांचा नेता कोण असावा यावर भाष्य करत नाही, मग भाजप नेत्यांनीही सरकारच्या खातेवाटपावर बोलू नये असे राऊत यांनी म्हटले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेला गृहमंत्रीपद हवे असल्याचे म्हटले होते. त्यावर टीका करताना राऊत यांनी भूमिका मांडली.