Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, आजच्या चौकशीला संजय राऊत अनुपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. संसदेचे सत्र सुरू असल्याने चौकशीसाठी पुढील तारीख राऊत ईडी (ED) अधिकाऱ्यांकडे मागू शकतात. याआधीदेखील संजय राऊत यांची जवळपास 10 तास चौकशी झाली होती. 


मागील आठवड्यात ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर, संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडीकडे चौकशीकरीता उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही चौकशी करावी अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, ईडीने फक्त एक आठवड्याची मुदत दिली होती.


ईडीने संजय राऊत यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी एक जुलै रोजी 10 तास चौकशी केली होती. त्याआधी एप्रिल महिन्यात ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील जमीन, दादर येथील घरावर टाच आणली होती. राऊत यांच्यासह त्यांचे कुटुंबीयदेखील ईडीच्या रडावर आहेत. 


दरम्यान, संजय राऊत यांचे निकवर्तीय प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी दिल्लीला नेण्यासाठी कोर्टाकडून  ईडीला परवानगी मिळाली आहे. प्रवीण राऊत यांना काही विशेष अटीशर्तीवर मुंबई सत्र न्यायालयाने दिल्लीला नेण्यास ईडीला परवानगी दिली आहे.


पीएसीएल (पर्ल्स एग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेड) या कंपनीच्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीत दाखल गुन्ह्यात ईडी राऊत यांची चौकशी करणार आहे. पीएसीएलने शेतजमिनीच्या विक्री आणि विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून 49 हजार 100 कोटी रुपये गोळा केले होते, असा आरोप आहे.


काय आहे पत्राचाळ घोटाळा?


पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.