Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा (Marathwada ) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 


राज्यात जून कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. मात्र, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने मराठवाड्यासह विदर्भात जोरदार हजेरी लावली. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात नद्या भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात आता हवामान विभागाने मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.




लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक गांवाचा संपर्क तुटला


लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. लातूर उदगीर मार्गाचे काम सध्या सुरु आहे. यामुळं अनेक ठिकाणी पर्यायी पूल बांधण्यात आले होते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे चांभरगा गावाजवळील लहान ओढ्यात पाणी आल्याने सिमेंटचे मोठे पाईप टाकून बांधण्यात आलेला पर्यायी पुल देखील वाहून गेल्याचे समजते. नरसिंगवाडी पाटी येथील पर्यायी पूल पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, जंगम वाडी, वेरूळसह अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.





औरंगाबादमध्येही जोराचा पाऊस


औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. खुलताबाद तालुक्यात पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गाव आणि परीसरात  झालेल्या पावसाने  गावाजवळील पूल वाहून गेल्यानं तब्बल सहा गावांचा संपर्क तुटला आहे. कसाबखेडा गावाशी  माटेगाव,चांभारवाडी, देभेगाव, देवळाणा, पिंपळगाव या गावातील लोकांचा दैनदीन व्यवहार असल्यानं दररोजचा संपर्क आहे. कसाबखेडा परीसरातील अनेक शेतकरी शेतात वास्तव्यास आहेत. गावात शाळा, बँक, दवाखाने आणि मोठी बाजारपेठ आहे. कसाबखेडा परीसरातील शेतकरी आणि माटेगाव, चांभारवाडी, विटखेडा,देभेगाव ,देवळाना पिंपळगाव या गावातील लोकांची वर्दळ गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील पुलावरुन होत असते. मात्र, मुसळधार पावसामुळं नळकांडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळं या गावातील नागरीकांच्या दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होऊन कसाबखेडा गावाशी संपर्क तुटला आहे.