कल्याण : होर्डिंगच्या माध्यमातून विरोधकांना राजकीय टोमणे, चिमटे काढणं हे काही नवीन नाही. परंतु कल्याणमध्ये लावलेलं एक बॅनर लक्ष वेधून घेत असून ते चर्चेचा विषय बनलं आहे. शिवसेना नगरसेवकाने खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख चमचे असा केला आहे. "खासदार दिलदार है...लेकिन कुछ चमचों से लोग परेशान है," असा टोमणा या होर्डिंगद्वारे लगावला आहे. या बॅनरवरील मजकुरामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं आहे.


याआधी देखील अनेक राजकीय टोमणे व चिमट्यांचे अनेक होर्डिंग कल्याणमध्ये झळकावण्यात आले होते. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्व नेतीवली परिसरात हे बॅनर लावण्यात आलं आहे. शिवसेना नगरसेवक मल्लेश शिवान शेट्टी यांनी हे बॅनर लावलं आहे.



शिवसेना नगरसेवकाने खासदाराला होर्डिंगच्या माध्यमातून शुभेच्छा देत त्यांना 'दिलदार' ही उपमा दिली. मात्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा मात्र 'चमचे' असा उल्लेख केला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे नगरसेवक नक्कीच दुखावले असावेत अशी चर्चा रंगली आहे. तर या होर्डिंगवर उल्लेख केलेले "चमचे" कोण असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. परंतु शिवसेनेतील अंतर्गत कलह उघड करणारा हा बॅनर नागरीकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.