मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary)  यांचा आज अकरावा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क (Shivaji Park) इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत.  महाविकास आघाडीचे नेतेही अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवण्यात आली आहे. राज्यभरातून अभिवादनासाठी  शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत.


शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा


स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर  शिवसेनेच्या शिंदे गट  आणि ठाकरे गट यी दोन्ही गटांमध्ये राडा झाला. परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली..तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली.  मात्र शिवतीर्थावरुन बाहेर येताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं.  


शिंदे गटाचा आरोप काय?


ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले. 


ठाकरे गटाने काय म्हटले?


शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी सुरुवात केली, आक्षेपार्ह वर्तन केले हे कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल देसाई यांनी म्हटले. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचे पावित्र्य भंग करायचे नाही, असेही त्यांनी म्हटले. 


हे ही वाचा :


Eknath Shinde : 'बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून पूर्वसंध्येला दर्शन घेतलं', राड्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया