कल्याण : शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या सोशल मीडिया वॉर विकोपाला गेल्याचं कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेवरुन समोर आले आहे. शिवसेना महिला उपशहर प्रमुख आशा रसाळ यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप विरोधात सातत्याने सोशल मीडियावर लिहित असल्याचं सांगत टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप आशा रसाळ यांनी केला आहे. मारहाण करताना एका तरुणाने मी माजी आमदार नरेंद्र पवार यांचा नातेवाईक असल्याचं सांगितल्याचं रसाळ यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. तर याबाबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घडलेला प्रकार निषेधार्ह आहे. मात्र या घटनेशी आमचा काडीमात्र संबंध नाही असा खुलासा  केला आहे.


कल्याण पूर्व भागातील राहणाऱ्या आशा रसाळ या शिवसेनाच्या उपशहर प्रमुख आहेत. 18 तारखेच्या रात्री जेवण करण्यासाठी त्या त्यांच्या पतीसोबत कल्याणनजीकच्या बापगाव परिसरात  एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. हॉटेल मध्ये गर्दी असल्याने त्या उभ्या होत्या. याच वेळी काही जण त्यांना शिवीगाळ करत होते. याबाबत आशा रसाळ यांनी त्या ठिकाणी सात ते आठ जणांनी त्यांना आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. कोळसेवाडीतील घटनेनंतर तुम्ही सोशल मीडियावर जास्त टार्गेट करत आहात, असे सांगत मारहाण केल्याचे सांगितलं. इतकेच नाही तर त्या रिक्षातून कल्याण पश्चिमेतील निक्कीनगरात पोहोचल्या. त्याठिकाणी येऊन सात ते आठ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. मारहाण करणाऱ्या लोकांनी भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांचे नातेवाईक असल्याचं सांगितलं, असं आशा रसाळ यांनी म्हटलं.


या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही केस आता पडघा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. पुढील तपास पडघा पोलीस करणार आहेत.


घटनेचा निषेध, पण माझा संबंध नाही : नरेंद्र पवार
याबाबत भाजपचे माजी आामदार नरेंद्र पवार यांनी या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, "या घटनेचा मी निषेध करतो. एका महिलेवर हल्ला करणं चुकीचं आाहे. यात माझा भाऊ पण असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी नि:पक्षपणे तपास केला पाहिजे. या घटनेची माझा काही संबंध नाही."