मुंबई: मुलुंड पश्चिममध्ये (Mulund West) एका महिलेला मराठी असल्याचं सांगत जागा नाकारल्याच्या घटनेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या… आता मुंबईतच मराठी माणसांना घरं नाकारली जात आहेत, यावर राज्य सरकार कारवाई करणार का? की 'थॅंक यू' म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. 


महाराष्ट्रीय माणसांना घरं देणार नसल्याचं सांगत एका महिलेला धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरे राज्य सरकारवर बरसले. ते म्हणाले की, मुंबईत मराठी माणसाला जागा दिली जात नाही ही चीड आणणारी घटना आहे. पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या… तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून 'हाताची घडी तोडांवर बोट' ठेवून गप्प बसणार? या बिल्डिंगवर कारवाई होणार का? उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की 'थॅंक यू' म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक 'इथे' दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना!


Trupti Sagar Deorukhkar Video : काय आहे प्रकरण? 


मुंबईतल्या मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक देण्याचा मुद्दा उफाळून आला आहे. महाराष्ट्रीयन माणसांना आम्ही आमच्या इमारतीमध्ये घर देत नाही असं सांगून त्या इमारतीतल्या गुजराती व्यक्तींनी घर भाड्यानं देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आपण जाब विचारल्यावर, आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं जागा पाहण्यास गेलेली असताना घरमालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला घर देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे.


मनसेने माफी मागायला लावली


मुलुंडमधील घटना समोर येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित बिल्डिंगमध्ये जात त्या सेक्रेटरीला माफी मागायला लावली. महाराष्ट्रीयन असल्याकारणाने जागा नाकारल्या बाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलुंड मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी आणि कार्यकर्त्यांनी जाऊन याबाबत संबंधितांना जाब विचारला व माफी मागायला लावली. वयाचा मान ठेवून फक्त माफी मागायला लावतोय, पुन्हा असा प्रकार घडला तर सोडणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी त्या गुजराती व्यक्तीला दिला.  


ही बातमी वाचा: