Raj Thackeray Shiv Jayanti 2022 : राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. शिवजयंती तारखेबाबत सुरू असलेल्या वादावर पडदा पडत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आज होणारी शिवजयंती साजरी कराच, मात्र तिथीनुसारही शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. यासाठी त्यांनी कारणही दिले आहेत. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील चांदिवली येथे पक्ष शाखेच्या उद्घाटनसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केले. राज ठाकरे यांनी म्हटले की, मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे. मात्र, याचा अर्थ आपण आज तारखेनुसार शिवजयंती साजरी करायची नाही असा होत नाही. वर्षभर, 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करायला हवा. 


राज यांनी सांगितलं, तिथीनुसार का साजरी करावी जयंती?


राज ठाकरे यांनी सांगितले की, आपण सगळे सण तिथीनुसार साजरे करतो. आपण कोणतेही सण तारखेनुसार साजरे करत नाही. दिवाळीदेखील आपण तारखेऐवजी नव्हे तर तिथीनुसार साजरे करतो. वाढदिवस, जन्मदिवस हे आपल्या सारख्या सामान्य लोकांचे असतात. मात्र, महापुरुषांची जयंती, त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्यासाठी सण आहे. त्यामुळे आपला हा सण तिथीनुसार साजरा करावा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. आज साजरी होणाऱ्या शिवजयंतीपेक्षा आणखी मोठा उत्साह तिथीनुसार शिवजयंती साजरी करताना दिसायला हवा असेही राज ठाकरे यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha