Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. 


व्हायरल होणारा व्हिडीओ हा मॉर्फ करण्यात आल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी केली असून दहिसर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मार्फ करणाऱ्या मुख्य आरोपीच्या शोध घेण्यासाठी दहिसर पोलिसांनी फेसबुक कंपनीला देखील पत्र पाठवलं आहे. 


शिवसेना शिंदे प्रवक्त्या शितल म्हत्रे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर आरोप केले होते. त्यांचा व्हिडीओ मॉर्फ करून मातोश्री या पेजवरून व्हायरल केला गेला होता. मातोश्री पेजवर अपलोड करणारा आरोपीला देखील दहिसर पोलिसांनी अटक केली आहे.


विनायक डावरे या 27 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हिडिओ व्हायरल करायला दिला असल्याची माहिती आहे. विनायक डावरे मातोश्री पेज ऑपरेट करत होता. शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र  म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. 


शीतल म्हात्रे आणि नरेश म्हस्के यांनी काल थेट मातोश्रीवर आरोप केले होते.


काय आहे प्रकरण?


गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅली शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.