मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पत्नीला कोरोना
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी देखील स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाले आहे. मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. माझ्या पत्नीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून शनिवार, 18 जुलैला माझा स्वॅब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटुंबियांची काळजी घ्या. घरी रहा, सुरक्षित रहा, असं ट्वीट शंकरराव गडाख पाटील यांनी केलं आहे.
कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण
या नेत्यांना कोरोनाची लागण, अनेकांनी केली मात
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मंत्री अशोक चव्हाण यांना देखील नांदेडमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाले आणि नंतर डिस्चार्ज मिळाला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह त्यांचे सचिव, पीए आणि काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. ते देखील कोरोनावर मात करुन बाहेर आले.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच आमदार मुक्ता टिळक यांनाही कोरोनाची लागण झाली. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील कोरोनाची लागण झाली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनाही काल कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मीरा भायंदरच्या आमदार गीता जैन, नाशिक देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
या राजकारण्यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाविरोधातील लढाईत काही राजकीय नेत्यांचा बळी देखील गेला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी, जळगावमधील रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना कोरोनामुळं जीव गमावावा लागला. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी, पडेगाव येथील शिवसेना नगरसेवक रावसाहेब आमले, राष्ट्रवादीचे सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचा देखील कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे.