मुंबई : नायर रुग्णालय आता आपल्या उपचारांमुळे कमी आणि त्यामध्ये होणाऱ्या वादांमुळे जास्त चर्चेत राहत आहे. तीन मृत कर्मचाऱ्यांना जिवंत दाखवत त्यांची पेन्शन आणि कुटुंब निवृत्ती वेतन लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनीच पेन्शन घोटाळा केल्याचे उघड झाले असून, आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंबई महापालिकेच्या कोषागार कार्यालयातून नायर रुग्णालयातील आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आस्थापना विभागातील चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मृत व्यक्तींच्या नावे आपल्या कार्यालयातून पेन्शनचे दावे मंजूर कसे करण्यात आले? याबाबत या नोटिशीमधून विचारणा करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या या नोटिशीला अधिकाऱ्यांनी उत्तर देतानाच या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली. त्यावेळी आस्थापना विभागातील कारकून प्रसाद गोसावी ऑगस्ट महिन्यात कंकू रावलीया यांचा सेवानिवृत्तीचा अर्ज घेऊन आला होता. हे लक्षात आले. मास्क लावलेली एक महिला प्रसादसोबत यावेळी आली होती. प्रसादने तिची ओळख रावलीया यांची सून असल्याची करून दिली होती. त्यांनी सादर केलेल्या अर्जावर बँकेचा स्टॅम्प आणि मॅनेजरची सही असलेला हयातीचा दाखला तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बोगस असल्याचे लक्षात आले. कंकू हिच्याप्रमाणेच आणखी दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे घडल्याचे निदर्शनास आले.


कारकून प्रसाद गोसावी यानेच दिशाभूल केल्याचे विभागीय चौकशीतून समोर आले. आपण अडकले जाऊ या भीतीने गोसावी याने आपली चूक मान्य केली आणि तीन मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने लाटलेले 9 लाख 91 हजार 700 रुपये महापालिका को ऑपरेटिव्ह बँकेत जमा केले. असे असले तरी फसवणूक, शासकीय रकमेचा अपहार आणि बोगस कागदपत्र तयार केल्यामुळे नायर रुग्णालयाच्या आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून प्रसाद गोसावी याच्यावर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कंकू रावलिया, निर्मला माघाडे, आणि शांताबाई जाधव या तीन मृत कर्मचाऱ्यांना जिवंत दाखवले आणि त्यांच्या नावाने त्यांची पेन्शन आणि कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून घेतले. या प्रकरणात अजून कोण सामील आहे याचा तपास पोलीस करत आहेत तसेच अजून किती लोकांच्या नावाने अशाप्रकारे शासनाची फसवणूक करण्यात आली आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.