मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव असतानाच, संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे. खुद्द संजय राऊत यांनी या मुलाखतीची माहिती ट्विटरद्वारे दिली. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतींनंतर, संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी पहिल्यांदाच अन्य राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची घेतलेली ही पहिलीच मुलाखत आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी चीनपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, अशा विविध विषयांवर आपली भूमिका मांडल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. 'सामना'त लवकरच या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणार आहेत. तसंच वृत्तवाहिन्यांवर ही मुलाखत प्रसारित होणार असल्याचं राऊत म्हणाले.


संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. शरद पवार चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडीपर्यंत जोरदार बोलले."





दरम्यान काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले होते. "आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो, ऐनवेळी शरद पवारांनी भूमिका बदलली," असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.


आता देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटांना शरद पवार काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे.