Sanjay Raut Press Conferance : शिवसेनेच्या पत्रकार परिषदेसंदर्भातील एक मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडीओ पॅटर्न पाहायला मिळणार आहे. व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आज कोणता गौप्यस्फोट होणार? संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून फोडल्या जाणाऱ्या राजकीय बॉम्बनं विरोधी पक्षातले कोणते नेते घायाळ होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि त्याच पत्रकार परिषदेसंदर्भातील एक मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शिवसेना भवनातील तयारी पाहता आजच्या पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडीओ पॅटर्न पाहायला मिळणार आहे. शिवसेना पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं समजतंय. आता व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान झुकेंगे नही असा मजकूर असलेले टी-शर्ट देखील शिवसेनेनं कार्यकर्त्यांना वाटले आहेत.
आज पत्रकार परिषदेत काय होणार?
आज सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेआधीच संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आज होणाऱ्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेच्या आधी 'सौ सुनार की एक लोहार की' असे राऊत यांनी म्हणत सूचक वक्तव्य केले. आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत आज सकाळीच शिवसेना भवनात दाखल झाले. शिवसेनेकडून या पत्रकार परिषदेसाठी खासदार, आमदारही उपस्थित राहणार आहेत.
काय म्हणाले होते संजय राऊत?
आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Shivsena : शिवसेनेच्या निशाण्यावर असणारे भाजपचे 'ते' साडेतीन नेते कोण? 'या' नावांची चर्चा
- Shivsena Press Conference : शिवसेनेची आज पत्रकार परिषद; पोलीस बंदोबस्तात वाढ, मुंबईकरांना केले 'हे' आवाहन
- ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha