Sanjay Raut On PM MODI : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर कालच्या बैठकीवरुन टीका केली आहे. आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, कालच्या बैठकीवर मी बोलणं योग्य नाही. कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या. पंतप्रधानांनी एकतर्फी संवाद साधला. बिगरभाजप शासित राज्यांचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांचं वागणं त्यांच्यासाठी वेगळ आणि भाजपशासित राज्यांसाठी वेगळं होतं. बिगर भाजपशासित राज्यांना टोमणे मारण्याचं जास्त काम झालं. पंतप्रधान मोदी कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करणार होते पण त्यांनी पेट्रोल डिझेल व्हॅटचा विषय काढला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीबाबत मराठी बाण्यानं जोरदार उत्तर दिलं आहे. देशाच्या पंतप्रधानांची देशासाठी जशी भूमिका असायला हवी होती, तशी भूमिका नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे.
लवकरच मुंबईत शिवसेनेची सभा होणार आहे, अशी माहितीही यावेळी संजय राऊतांनी दिली आहे. भाजप-राष्ट्रवादीची युती 2017 साली होणार होती यावर बोलताना राऊत म्हणाले की, असं काहीच नाही. मला त्यावेळी काय घडलं आणि भविष्यात काय घडणार आहे हे देखील माहिती आहे.
कुणाबरोबर कुणाचे फोटो आहेत हा प्रश्न नाही तर...
लकडावालाचे महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतच्या फोटोंबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुणाबरोबर कुणाचे फोटो आहेत हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की कुणाबरोबर त्यांनी आर्थिक व्यवहार केलेत याची चौकशी व्हावी. ईडीनं त्यांना चौकशीसाठी का बोलावलं नाही. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटक असलेल्या व्यक्तिसोबत यांचे आर्थिक व्यवहार आहेत आणि ईडीनं चौकशीसाठी का बोलावलं नाही, हे महत्वाचं आहे. याची उत्तरं द्यायला हवीत मात्र खरं बोललं की पळ काढला जातो, असं राऊत म्हणाले. मोबाईलचा जमान्यात कुणाचाही फोटो कुणासोबतही निघू शकतो, असंही ते म्हणाले. लग्न किंवा अन्य समारोहांमध्ये कोण बाजूला येऊन उभं राहतं, फोटो काढत काही कळत नाही, असंही ते म्हणाले.