Sanjay Raut On Mamata Banerjee : काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी ममता बॅनर्जींनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जींनी "देशात यूपीए आहे कुठे?" असं म्हटलं होतं. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. तर भाजपनंही ममतांच्या मुंबई दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोक सदरातून भाजपचा समाचार घेतला आहे. त्याचप्रमाणे आजच्या सदरातून राऊतांनी गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, योगी आदित्यनाथ, गुजरातच्या मंत्रिमंडळाच्या मुंबई दौऱ्याची आठवण भाजपाला करून दिली आहे. 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असल्यानं आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबईत बंगाल भवन उभारण्यासाठी भूखंड मिळावा अशी मागणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरात ही माहिती दिली आहे. तर पर्यटनमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामाचंही दीदींनी कौतुक केल्याचं राऊत यांनी रोखठोकमध्ये नमूद केलं आहे. तसंच आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी ममता बॅनर्जी हॉटेलच्या लिफ्टपर्यंत आल्याचा किस्साही राऊत यांनी सांगितला आहे. 


पाहा फोटो : रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी सांगितला Aditya Thackeray-Mamata Banerjee भेटीचा किस्सा



शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "ममता बॅनर्जींनी जाताना सोबत काहीच नेले नाही हे उगाच ओरड करणाऱ्यांनी आणि मुंबईला ओरबाडणाऱ्यांना साथ देणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजप विरोधासाठी विरोध करतो, हे ममतांच्या दौऱ्यातही दिसलं. मुंबईत येऊन उद्योगपतींना भेटण्यात गैर काय?" पुढे बोलताना ते म्हणाले की, "ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा अनेक अर्थाने गाजला. प. बंगालात व महाराष्ट्रात पर्यटन वाढावे, असा सूर श्री. आदित्य ठाकरेंबरोबरच्या चर्चेत निघाला. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटल्या, याची खळखळ भाजपने केली; पण त्याच वेळी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन 'व्हायब्रंट गुजरात'साठी उद्योगपतींना भेटत होते यावर भाजप बोलायला तयार नाही, हे ढोंग आहे!" 


रोखठोकमध्ये आदित्य ठाकरे - ममता बॅनर्जींच्या भेटीचा किस्सा 
 
संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये आदित्य ठाकरे - ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. "आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या. "तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठीशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करीत आहे. तरुणांची शक्ती मला माहीत आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवे!", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 


"मुंबई में क्या रखा है?" , संजय राऊतांकडून माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या वक्तव्याची आठवण 


"दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या 'ट्रायडेण्ट' हॉटेलात श्री. आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा मला गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाली. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. "मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला." असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल. महाराष्ट्राने प. बंगालच्या विकासासाठी सहकार्य करायला हवे. 


दिवसभरातील बातम्या लाईव्ह पाहण्यासाठी एबीपी माझा युट्यूब चॅनलवर भेट द्या