Sanjay Raut ED : पत्राचाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी 'येऊ द्या...सगळ्यांना येऊ द्या' अशी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची याआधी जानेवारी महिन्यात चौकशी करण्यात आली होती. 


शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी संजय राऊत यांना  जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ईडी कार्यालयात त्यांना आणले. त्यावेळी पत्रकारांनी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले असल्याची विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनी, 'आने दो...आने दो...सबको आने दो' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. दरम्यान सध्या संजय राऊत अटकेत आहेत.


शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं.


संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?


शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Varsha Raut Property : संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये संपत्ती; कधी आणि कितीला खरेदी केली जमीन, पाहा यादी