मुंबई: ईडीनं संपत्ती जप्त केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत गुरुवारी दिल्लीहून मुंबईत येणार आहेत. त्यावेळी शिवसेनेने त्यांच्या स्वागताची तयारी केली असून पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. संजय राऊत यांचे स्वागत मुंबई विमानतळापासून ते त्यांच्या भांडुपमधल्या घरापर्यंत केलं जाणार आहे.
खासदार संजय राऊत यांच्या आगमनाच्या निमित्ताने शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी 40 बसेस, ढोल-ताशा पथक अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार आणि काही मंत्रीही विमानतळावर उपस्थित असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असे आव्हानही राऊत यांनी दिलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.
ईडीच्या कारवाईनंतर काय म्हणाले संजय राऊत? ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती. ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यांना जर मदत केली नाही तर माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील अशी माहिती होती.
आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतोखासदार संजय राऊत म्हणाले की, "या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते, आता होत आहेत. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, मी शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही. इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही."
संबंधित बातम्या:
- Amit Shah : डोळ्यात डोळे घालून उत्तर देणार का?, राऊतांचा अमित शाहांना सवाल तर डोळ्यात डोळे घालून आधी प्रश्न विचारा, शाहांचं राऊतांना उत्तर
- आयएनएस विक्रांतचा घोटाळा बोफर्सपेक्षा मोठा, संजय राऊतांचा हल्लाबोल
- Sharad Pawar : राज्यपालांची तक्रार आणि संजय राऊतांवर ईडीच्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर: शरद पवार