BMC Khichdi Scam Case :  कोविड काळातील (BMC Covid Scam) खिचडी प्रकरणात (Khichdi Scam) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू संदीप राऊत (Sandeep Raut) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात संदीप राऊत यांना चौकशीसाठी 30 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात आधीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. 


संदीप राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत. संदीप राऊत यांची याआधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडूनही चौकशी झाली होती. खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांनाही मिळाले असल्याचा आरोप आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर आता संदीप राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. 


खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय? 


मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब स्थलांतरीत  कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या स्थलांतरीत  कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे. 


खिचडी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल 


मुंबई महापालिकेच्या कथित  खिचडी घोटाळा प्रकरणात  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


सूरज चव्हाण यांना अटक  


आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना 17 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्याआधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांचीही चौकशी केली होती. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्याचं समोर आलेलं.  चौकशी दरम्यान या दोघांनाही खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत विचारणा झाली. चौकशीत या दोघांनी आपण, फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्यानं त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचं सांगितलं. दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत होते. 


सूरज चव्हाण यांचा या कंत्राटाशी काय संबंध काय?


ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून काही सब टेंडर देण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय साहित्य आणि सेवा पुरवण्याचे सब टेंडर होते. असं टेंडरशी संबंध सुरज चव्हाण यांचा येतो, त्यामुळे या संपूर्ण कंत्राटामध्ये आर्थिक व्यवहार होताना नियमांचं उल्लंघन झालं का? यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार करण्यात आला का? या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.