Salman Khan : लहान मुलांची तस्करी हा सर्वात घ्रृणास्पद गुन्हा, हा गुन्हा करणाऱ्यांना आणि त्याच्या पाठिशी असणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत दबंग अभिनेता सलमान खान याने व्यक्त केलं आहे. मुंबई पोलिसांची कारवाई ही कौतुकास्पद असून देव त्यांचं भलं करो असं म्हणत सलमान खानने मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे. गुरुवारी मुंबई पोलिसांनी मुलांची तस्करी करणाऱ्यांना अटक केली होती, त्यानंतर सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मत व्यक्त केलं आहे.
सलमान खान असा अभिनेता आहे जो अनेक मुद्द्यावर खुल्यापणाने आपलं मत व्यक्त करतो. आताही त्याने चाईल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे लहान मुलांच्या तस्करीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. सलमान खानने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई पोलिसांचं देव भलं करो. लहान मुलांची तस्करी करणे आणि त्याला पाठिंबा देणं हे सर्वात घ्रृणास्पद कृत्य आहे. असं कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. तस्करी करण्यात आलेली सर्व मुलं त्यांच्या पालकांना परत मिळावित ही प्रार्थना.
सलमान खान याच्या या ट्वीटनंतर मुंबई पोलिसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कामाचं कौतुक केल्याबद्दल अभिनंदन असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कारवाई करत सोलापूर येथून दोन महिलांना अटक केली होती. या कारवाईत अपहरण झालेल्या एक वर्ष आणि एक महिन्याच्या चिमुरडीची सुटका करण्यात आली. भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातोय आणि त्यासाठी त्यांची चोरी होत असल्याचं समोर आलंय. गेल्या आठवड्यात सांताक्रूझ येथून एका चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते आणि त्याबाबत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुस्कान शेख या तक्रारदार महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. ती फुटपाथवर वास्तव्यास असते आणि तिची एका वर्षाची मुलगी गायब झाली होती. मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 30 ऑक्टोबरची घटना आणि 31 ऑक्टोबरला अपहरणचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा मदतीने पीडित मुलीचा शोध घेत आरोपीचा शोध लावला. शरिफा शेख आणि सुजाता पासवान अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.