मुंबई : वादात सापडलेले एपीआय सचिन वाझे यांच्यावर मृत मनसुख हिरण यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आता वाझेंनी अटकेपासून वाचण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा अर्ज काल म्हणजेच 12 मार्च रोजी दाखल केला होता. मात्र अद्याप तरी कोर्टाने त्यांना अटकेपासून कोणताही दिलासा दिलेला नाही. कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना 19 मार्च रोजी आपला अहवाल देण्यास सांगितलं आहे.
या अर्जात सचिन वाझे यांनी लिहिलं आहे की,
1. एफआयआरमधील सर्व आरोप खोटे असून निव्वळ अफवा आहेत.
2. एफआयआरमधील निराधार आरोपांद्वारे कोणालाही अटक होऊ शकत नाही
3. एफआयआरमध्ये कोणतेही ठोस पुरावे नाही, शिवाय आतापर्यंतच्या तपासामध्येही असं काहीही आढळलं नाही, ज्यावरु ही हत्या आहे हे सिद्ध होईल.
4. एफआयआरमध्येही आरोपीच्या कॉलमध्ये अज्ञात व्यक्ती लिहिलं आहे.
5. अर्जदार (सचिन वाझे) ठाण्यात अनेक वर्षांपासून राहत आहे आणि मनसुख हिरण यांच्याशी केवळ ओळख असणे, यातून आरोप सिद्ध होत नाही
6. कोणताही गुन्हा लपवण्यासाठी (जसा आरोप केला जात आहे) या तपासात सामील झालेलो नव्हतो. 8 मार्च रोजी सचिन वाझे यांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली, त्यावेळी तज्ज्ञ, वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम आणि स्वत: पोलीस उपायुक्त उपस्थित होते. त्यावेळी वाझे यांनी सांगितलं की, ज्यावेळी कथित हत्या झाली तेव्हा मी दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात होतो. त्यावेळी सचिन वाझे यांच्यावर कोणताही संशय वर्तवला नाही की ते असं काही करु शकतात (म्हणजेच मनसुख हिरण यांची हत्या). कोणालाही असं काही सापडलेलं नाही की त्यावरुन ही हत्या सचिन वाझे यांनी एखाद्या उद्देशापोटी किंवा फायद्यासाठी केली असावी.
7. सचिन वाझे 4 मार्च रोजी संपूर्ण दिवस दक्षिण मुंबईमध्ये होते. त्यानंतर 4 आणि 5 मार्चच्या रात्री कोणत्यातरी ऑपरेशनसाठी डोंगरी परिसरात होते. ज्याचे पुरावेही मिळाले आहेत, डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये एन्ट्री असल्याचा रेकॉर्ड स्टेशन डायरीमध्ये मिळाला आहे.
8. बातम्या आणि सोशल मीडियावर सचिन वाझे हत्येमध्ये सामील असल्याबाबत अटकळ बांधल्या जात आहेत, पण त्याचा कोणताही आधार नाही आणि त्या चुकीच्या आहेत. कदाचित या बातम्या एजन्सीच्या निकालात बदल करण्यासाठी दबाव टाकू शकतात, यासाठी वाझे यांनी एबीए फाईल केली आहे.
संबंधित बातम्या
एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल
Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्याच; हिरेन कुटुंबियांचा आरोप
ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं आयुष्यचं बदलून गेलं..