मुंबई : भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अनेक रुमाल बांधलेले होते. मनसुख हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे खाडीत त्यांचा मृतदेह आढळल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे. अशातच याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानं केली आहे. आज एटीएसचं पथक चौकशीसाठी मनसुख हिरेन यांच्या घरी गेलं होतं. त्यावेळी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं हिरेन यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.


आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचलं होतं. त्यावेळी हिरेन कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले. आज झालेल्या चौकशीमध्ये हिरेन यांच्या कुटुंबियांनी एटीएसला ही आत्महत्या असू शकत नाही, हा खून असल्याचे सांगितले. तसेच यावेळी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानं केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, आता मनसुख हिरेन यांचा मुलगा एटीएसच्या पथकासोबत गेला असून आता याप्रकरणी कुटुंबियांच्या वतीनं हत्येचा गुन्ह्या दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकानं मनसुख हिरेन यांच्या घरी तब्बल साडेतीन तास चौकशी केली.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला असल्याची माहिती दिली होती. अशातच एटीएसने याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता, त्याठिकाणी एटीएसच्या पथकानं भेट दिली आहे. एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. तिथे त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचं पथक संपूर्ण घटना समजून घेऊन क्राईम सीनही रिक्रिएट करणार आहे. तसेच एटीएसचं पथक संपूर्ण परिसरातील फोटेजही तपासत असून घरातून निघाल्यानंतर मनसुख हिरेन नेमके कुठे गेले, याचा शोध घेण्याचा एटीएसचं पथक प्रयत्न करत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या तपासाला वेग आला असून एटीएसच्या तपासातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :