मुंबई : 2 डिसेंबर 2002 चा दिवस, घाटकोपर स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या बसमध्ये दिवसाढवळ्या स्फोट झाला आणि मुंबई हादरली. 2 जणांचा जागीच जीव गेला तर 50 जण जखमी झाले. या स्फोटाआधीही मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती. त्यामुळेच मुंबई आणि ठाणे पोलीस सतर्क झाले. धरपकड सुरु झाली. आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि 63 गुन्हेगारांना यमसदनी धाडणाऱ्या सचिन वाझे यांच्या हाताशी लागला ख्वाजा युनुस.


ख्वाजा युनुस, वय 27 वर्ष, पेशानं इंजिनियर, दुबईत नोकरी करायचा. पण पोलिसांना ख्वाजा युनुसचं आणि घाटकोपर स्फोटाचं कनेक्शन मिळालं आणि तपास सुरु झाला. 25 डिसेंबरला पोटा कायद्याखाली 27 वर्षाच्या ख्वाजा युनुसला अटक करण्यात आली. आठवडाभर ख्वाजा युनुस आणि त्याच्या इतर तीन साथीदारांची कसून चौकशी सुरु होती. पण यात एक ट्विस्ट आला. पोलिसांनी 6 जानेवारीला ख्वाजा युनुस कस्टडीतून पसार झाल्याचं सांगितलं. दहशतवादी हल्ल्यातील आरोपी मोकाट सुटल्याचं कळताच देशभर खळबळ उडाली.


सचिन वाझे आणि त्यांच्या साथीदारांनी ख्वाजा युनुसच्या पसार होण्याचीही कहाणी रचली. ख्वाजाला तपासासाठी औरंगाबादला नेत असताना तो पारनेरजवळ पोलिसांवर हल्ला करुन पळाल्याचा दावा पोलिसांनी केला. ख्वाजाच्या कुटुंबियांना यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. ख्वाजा पोलीस कस्टडीत मारला गेल्याचा दावा त्यांनी केला. चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली. सचिन वाझेंची ख्वाजा पळून गेल्याची कहाणी खोटी असल्याचा निष्कर्ष सीआयडीनं काढला. 2004 मध्ये सचिन वाझे आणि त्यांच्या साथीदारांना ख्वाजा युनुसच्या कस्टडीतील मृत्यू प्रकरणी निलंबित करण्यात आलं. 63 एन्काऊंटर केलेल्या वाझेंना लागलेला हा पहिला शॉक होता.


एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे पुन्हा चर्चेत, 63 एन्काऊंटर, महत्वाच्या प्रकरणांमध्ये नाव, शिवसेनेशी जवळीक!


सचिन वाझे गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जायचे. पण ख्वाजा युनुस प्रकरणानं त्याची कारकीर्द डागाळली. कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या सुरु असतानाच सचिन वाझेंची शिवसेनेच्या नेत्यांशी उठबस वाढली. आणि वाझे 2008 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत दाखल झाले. तेसुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत. दरम्यानच्या काळात सचिन वाझेंनी पोलीस दलाला रामराम करण्याची तयारी केली. राजीनामा पोलीस दलाकडे सुपूर्द केला. पण तो स्वीकारण्यात आला नाही. सचिन वाझे कोर्ट कचेऱ्यात फसले आणि मुंबईचं अंडरवर्ल्डही शांत झालं. वाझे काळाच्या पडद्याआड गेले होते.


ख्वाजा युनुसच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्याचे वडील सय्यद ख्वाजा 2004 मध्ये मरण पावले. आई असिया बेगम अस्थमा पेशंट होती. तिन्ही मुलासाठी सर्वस्व पणाला लावलं. कोर्टाच्या प्रत्येक तारखेसाठी ख्वाजाचं कुटुंब थेट परभणीहून मुंबई हायकोर्टात खेटे घालत होते. तर दुसरीकडे सचिन वाझेंसाठी पोलीस दलाचे दरवाजे काही उघडत नव्हते. दोन वेळा विनंती करुनही त्यांना पोस्टिंग मिळाली नाही.


पण याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं. फडणवीसांविरोधात तीन पक्ष एकत्र आले. ज्या शिवसेनेत वाझेंनी 2008 साली प्रवेश केला होता. त्याच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. परमबीर सिंग पोलीस आयुक्त झाले आणि सचिन वाझे पुन्हा मुंबई पोलीस दलात आले. मुंबई पोलीस दलात आल्यानंतर वाझेंना थेट क्राईम ब्रांचमध्ये नियुक्ती मिळाली. सगळ्या महत्त्वाच्या केसेसही वाझेंच्या नेतृत्वात देण्यात आल्या. वाझेंचं वजन वाढलं. पण अंबानींच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्यांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणानं वाझे पुन्हा सेंटर पॉईंटला आले.


आता स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. विरोधी पक्षानं पुन्हा एकदा सचिन वाझेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. तपास एटीएसकडे आहे आणि सचिन वाझेंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं.