Saamana Editorial on Congress : उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या (Congress) चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल (Hardik Patel) आणि सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठं लावायचं? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मित्रपक्ष काँग्रेसला सवाल केला आहे. 


सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, "राहुल गांधींनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. 2024 ची तयारी मोदी आणि त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील 'गळती' हंगाम सुरूच आहे. या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झालीय. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरं नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?" 


काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे? : सामना 


काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेस नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून 'गळती' हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही. पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी 'हाक' दिली असतानाच नव्याने गळतीचा आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.


जाणून घेऊया सामना अग्रलेखात काय म्हटलंय? 


राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत.


2024 ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करीत असताना काँग्रेसमधील 'गळती' हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?


काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून 'गळती' हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळय़ांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी 'हाक' दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे. पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाला काही सवाल केले. ''मी पंजाब आणि राष्ट्रहिताचेच बोलत होतो, पण त्यावर काँग्र्रेसने मला 'नोटीस' देऊन काय साध्य केले?'' हा त्यांचा मुख्य सवाल आहे. काँग्रेसने माझा राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाखड करतात. माधवराव शिंदे, जीतेंद्र प्रसाद व बलराम जाखड या


तीनही नेत्यांना


काँग्रेसने भरभरून दिले. त्यांच्या मुलांचेही कल्याण करण्यात काँग्रेसने कधी हात आखडता घेतला नाही. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद व सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठय़ा निघाल्या. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी काँग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल. तरुणांना काँग्रेस पक्षात आपले भविष्य दिसत नसेल तर कसे व्हायचे? आज काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही व उदयपूरच्या चिंतन शिबिरात त्यावर चर्चा झाली, पण नेतृत्वाचा प्रश्न अधांतरी ठेवून चिंतन शिबीर संपवले गेले. चिंतन शिबिरात काही निर्णय झाले. 'एक व्यक्ती एक पद' वगैरे घोषणा झाल्या. घराणेशाहीलाही विरोध झाला, पण जाखड यांच्या पाठोपाठ गुजरातच्या हार्दिक पटेलनेही काँग्रेस सोडली. ज्या राज्यांत आता निवडणुका आहेत, त्या राज्यांत जनसंपर्क असलेल्या नेत्यांना तरी काँग्रेसने सांभाळले पाहिजे. एका नवज्योत सिद्धूसाठी काँग्रेसने पंजाब राज्य हातचे गमावले. तो सिद्धूही आता जेलमध्ये गेला आणि सिद्धूला अवास्तव महत्त्व मिळाले म्हणून जुनेजाणते जाखडही गेले. हार्दिक पटेल हा तरुण नेता काँग्रेसमध्ये आला तेव्हा गुजरात काँग्रेसला बहार येईल असे वाटले होते, पण हार्दिकला राज्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामच करू दिले जात नव्हते. हातपाय बांधून शर्यतीत उतरवले असे हार्दिक पटेल याचे सांगणे आहे. हार्दिकने जाता जाता राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. देशाला व पक्षाला


सर्वाधिक गरज असते तेव्हा


काँग्रेसचे नेतृत्व हमखास देशाबाहेर असते, असे हार्दिक पटेल म्हणतो. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष असल्याचा साक्षात्कार हार्दिकला झाला. दुसरे म्हणजे, ऊठसूट अंबानी-अदानी यांना शिव्या घालून काहीच साध्य होणार नाही. गुजरातमधील प्रत्येक तरुणाला वाटते, आपणही अदानी-अंबानी व्हावे. अदानी-अंबानी त्यांचा आदर्श आहेत. त्यांच्या आदर्शावरच हल्ले करून गुजरात विधानसभा निवडणूक कशी लढणार? असा कडवा सवाल हार्दिक पटेलने केला आहे. काँग्रेस दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, असे हार्दिक पटेल याचे म्हणणे आहे. काँग्रेसने देशभर 6500 पूर्णकालीन कार्यकर्ते नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, पण उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांना प्रदेशाध्यक्ष नाहीत. या दोन मोठय़ा राज्यांच्या नेतृत्वाशिवाय उदयपूरचे चिंतन शिबीर झाले. सोनिया गांधी यांचे वय आणि प्रकृती याबाबत अनेकांना चिंता वाटते. अर्थात, काँग्रेसचे नेतृत्व त्या तरीही करतात व त्यांचाच शब्द प्रमाण मानला जातो. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. 2024 ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळय़ा पद्धतीने करीत असताना काँग्रेसमधील 'गळती' हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?