मुंबई : मुंबईत शाळा आणि कार्यालयं कधीपासून पूर्णपणे सुरु होतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यात आता वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. यात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) मुंबई महापालिकेला सुचवलंय की 1 नोव्हेंबरपासून ऑफिसेस, लोकल आणि 1 जानेवारी 2021 पासून शाळा सुरु करु शकतात. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने शास्त्रीय मॉडेलवर काढलेली ही तारीख आहे.


टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने कोविड - 19 साथीचा रोग या विषयावर गणितीय पद्धतीनं शास्त्रीय मॉडेल बनवत अंदाज व्यक्त केला आहे आणि बीएमसीला सादर केला आहे.


1 नोव्हेंबर ही मुंबईची कार्यालये आणि वाहतुकीचं नेटवर्क पूर्णपणे उघडण्यासाठी गणितीय पद्धतीने केलेल्या अभ्यासाच्या आधारे काढलेली शास्त्रीय तारीख आहे. स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्यूटर सायन्सचे डीन संदीप जुनेजा यांनी अहवालात म्हटले आहे की, जानेवारी 2021 मध्ये शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात.


Corona Updates | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक; एका दिवसात तब्बल 20 हजार 489 रुग्णांची नोंद


हार्ड इम्युनिटीबाबत अहवालात म्हटलं आहे की, यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत जवळजवळ 75% झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये तर अन्य भागातील 50% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतील.


टीआयएफआरच्या टीमने म्हटले आहे की, मुंबईत सप्टेंबर महिन्यात कार्यालयांमध्ये उपस्थिती आणि परिवहन यंत्रणेची क्षमता या दृष्टीने शहर 30 टक्क्यांनी सुरु केली जाऊ शकते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते. शहर आणखी हळूहळू खुले केले पाहिजे आणि 1 नोव्हेंबरच्या सुमारास पूर्ण कार्यान्वित व्हावे, असे डॉ जुनेजा यांनी म्हटलं आहे.


सार्वजनिक वाहतुकीमध्ये सामाजिक अंतराचे निकष पाळले पाहिजेत आणि मास्कचा अनिवार्य वापर, हातांची स्वच्छता आणि गाड्या व कामाच्या ठिकाणी नियमित निर्जंतुकीकरण यासारख्या स्वच्छतेच्या उपायांचे पालन केले पाहिजे, असंही अहवालात म्हटलं आहे.