भिवंडी : काल्हेर गावात बंदुकीचा धाक दाखवत हात-पाय दोरीने बांधून एक कोटी 86 लाखांचा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या प्रकरणी दोन दरोडेखोरांना ठाणे क्राइम ब्रांचने डोंबिवली व मुंबई परिसरातून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले 1 कोटी 26 लाखांचे सोन्याचे सर्व दागिने जवळपास रिकव्हर करण्यात आले असून 60 लाखांची रोख रक्कम रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध देखील पोलीस घेत आहेत.

बंदुकीचा धाक दाखवत चोरी -
काल्हेर येथील व्यावसायिक जगदीश बळीराम पाटील यांची ठाणे भिवंडी रस्त्यालगत बी.सी. अपार्टमेंट ही इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावर ते आपल्या पत्नी वंदना, मुलगा शुभम, मुलगी पल्लवी यांच्यासोबत राहत असून जगदीश पाटील हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे फक्त दरवाजा ओढला. ते बाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले चौघे लुटारू इमारतीच्या जिन्यावरून चढून घराच्या दरवाजाचे आतील कुलूप उघडून घरात शिरले. लुटारुंनी घरात प्रवेश करताच पत्नी वंदना व मुलगी पल्लवी झोपलेल्या खोलीत ते शिरले व दोघींना जगदीश पाटील यांना ठार मारू अशी धमकी देत पत्नी वंदनाच्या डोक्यावर बंदूक ठेवली व हात रस्सीने बांधून मुलीस कपाटाचे लॉकर उघडण्यास सांगून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेतली. त्यानंतर मुलगा शुभम झोपलेल्या खोलीत लुटारूंनी मोर्चा वळवला. त्यावेळी शुभम झोपेतून जागा होताच त्याचे सुध्दा हात रस्सीने बांधून तेथील कपाटातील सर्व ऐवज काढून घेऊन अवघ्या 20 मिनिटातच घरातील 60 लाखांची रोकड व एक कोटी 26 लाख 30 हजार रुपये किमतीचे 421 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आदी ऐवज घेऊन लुटारूंनी पोबारा केला.

पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चॉपरने वार करुन खून

दोन दरोडेखोर ताब्यात -
या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शुभम पाटील याने दाखल केलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघा लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी स्थानिक पोलीसांसह गुन्हे शाखा भिवंडी, ठाणे, खंडणी विरोधी पथक अशी एकूण बारा पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, ठाणे क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील दोन दरोडेखोरांना डोंबिवली व मुंबई परिसरातून ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक कोटी 26 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. तर 60 लाखांची रोख रक्कम रिकव्हर करण्याचं काम सुरु आहे.

Bhiwandi Theft | बंदुकीच्या धाकाने दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक, कोट्यवधींचे दागिने पोलिसांकडून हस्तगत