मुंबई : मुंबई विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये होणारं प्रशिक्षण शिबीर रद्द करण्यात आलं आहे. राजीव सातव यांनी ट्वीट करत मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे शिबीर रद्द करण्यात आलं आहे. म्हाळगी प्रबोधिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याने राजीव सातव यांनी आक्षेप घेतला होता, त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्याशी चर्चा केली आणि काल सकाळच्या सेशननंतर प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला गेला.


मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचं रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये जर प्रशिक्षण होत असेल आणि त्यावर संशय व्यक्त होत असेल तर त्याची चौकशी करण माझं काम होतं. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर आणि सचिव यांच्याशी चर्चा केली. संशय निर्माण करणारं प्रशिक्षण जर होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही काल सकाळच्या सेशननंतर दोन दिवसाचं प्रशिक्षण एक दिवसात त्वरित थांबवलं, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

यशदा एवढं मोठं प्रशिक्षण केंद्र असताना तिथे आपण का प्रशिक्षण घेतोय? असा प्रश्न मी कुलगुरू यांना विचारला. त्यावेळी मागील सरकारमध्ये आधीच्या मंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला होता, असं त्यांनी सांगितलं. याची सविस्तर चौकशी करावी, अस मी सांगितलं आहे. संघटना आक्रमक झाल्या तर मी त्यांच्याशी चर्चा करेल. सविस्तर बैठक बोलवून याबाबत मी पुढे जाणार आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं.


सरकारच्या वैचारिक अस्पृश्यतेचा निषेध- आशिष शेलार


विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधील प्रशिक्षण रद्द केल्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे आणि याबाबत फेरविचार करण्यास सांगितलं आहे. ही संस्था विविध विद्यापीठांच्या आणि यशदा सारख्या संस्थासोबत संयुक्तपणे काम करते. याठिकणी भाजप किंवा संघाचीच नाही तर इतर पक्षाचे सुद्धा प्रशिक्षण वर्ग झालेले असताना हे प्रशिक्षण रद्द करणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी असल्याचं आशिष शेलार यांनी पत्राद्वारे कळवलं आहे. इतकच नाहीतर पुरोगामी महाराष्ट्रमध्ये सरकारच्या वैचारिक अस्पृश्यतेचा निषेध करत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.





मुंबई विद्यापीठाने मागील 5 ते 6 महिन्यांपासून विद्यापीठातील 30 प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संस्थेत प्रशिक्षण द्यायचे योजले होते. त्यानंतर 2 जानेवारीला विद्यापीठ आणि संस्थेत पत्रव्यहार होऊन ज्याठिकणी भाजपच्या चिंतन बैठक होतात, ज्या ठिकाणी राजकारणाचे प्रशिक्षण दिले जाते त्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये विद्यापीठाचे अधिकारी 31 आणि 1 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण घेणार असल्याचे पत्रक काढण्यात आलं. याठिकणी प्रशासनातील विविध विषयांवर प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तीकडून देण्यात आलं.


या प्रशिक्षणात नेमकं काय शिकवले?


शासनाशी पत्रव्यवहार, परिपत्रक काढणे, विद्यापीठ कायदा आणि नियम, माहिती अधिकार आणि विधीमंडळातील प्रश्न हाताळणे, निर्णय क्षमता व नेतृत्व विकास, मनुष्यबळ व्यवस्थापन व टीमवर्क, प्रशासन कुशलता, परस्पर संवाद कौशल्य या विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन दिलं जातं.