भिवंडी : नवरा-बायकोच्या भांडणात समजूत घालण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चॉपरने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली आहे. नदीम अनिस मोमीन (वय 35 वर्ष) असे मयत इसमाचं नाव असून इमरान रसूल सैय्यद (वय 34 वर्ष) असे हत्या करणाऱ्या आरोपी नवऱ्याचं नाव आहे.
आरोपी इमरान रसूल सैय्यदचं मागील सहा महिन्यांपासून आपल्या पत्नीशी घटस्फोटावरुन भांडण सुरु होतं. मात्र या दोघं पती-पत्नीची समजूत घालण्यासाठी नदीम अनिस मोमीन त्यांच्या घरी गेले असता, तिथे आरोपी आणि मयत यांच्यात बाचाबाची झाली. आमच्या भांडणात तू का येतो, असे म्हणत आरोपी आणि मयत यांच्यात हाणामारी झाली. मात्र या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी इमरान आणि त्याचा एक साथीदार यांनी मिळून नदीमला अजंठा कंपाऊंड परिसरात गाठलं. त्याच्यावर चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात नदीम मोमीनचा जागीच मृत्यू झाला.
नदीमला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला पाहून आरोपी आण साथीदार पळून जात असताना, नागरिकांनी इमरानला पकडून चांगलाच चोप दिला. तर इमारनचा साथीदार घटनास्थळावरुन फरार झाला आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी इमरानवर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याच्यावर ठाणे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपी इमरानने हत्या करण्यापूर्वी हत्या करण्यास जात असतानाचा एक व्हिडीओ आपल्या पत्नीला पाठवला होता. तसंच व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंग करुन नदीमची हत्या करणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी इमरानला अटक केली आहे. तसंच त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.
पती-पत्नीचं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चॉपरने वार करुन खून
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2020 10:28 AM (IST)
आरोपी इमरान रसूल सैय्यदचं मागील सहा महिन्यांपासून आपल्या पत्नीशी घटस्फोटावरुन भांडण सुरु होतं. मात्र या दोघं पती-पत्नीची समजूत घालण्यासाठी नदीम अनिस मोमीन त्यांच्या घरी गेले असता, तिथे आरोपी आणि मयत यांच्यात बाचाबाची झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -