कल्याण : महिलेशी असभ्य वर्तन करणं आरपीएफ जवानाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण, या आरपीएफ जवानाची सेवेतून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात 18 जून रोजी ही घटना घडली होती. ज्यात राजेश जांगीड नामक आरपीएफ जवानाने झोपेचं सोंग घेत एका महिलेशी असभ्य वर्तन केलं. याबाबतचा व्हिडीओ उपस्थित प्रवाशांनी चित्रित केला आणि जांगीडला मारहाणही केली, मात्र इतकं सगळं होऊनही जांगीडने स्वतःहून वरिष्ठांना याबाबत काहीही सांगितलं नव्हतं.

अखेर दोन दिवसांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती.

या चौकशीत जांगीड दोषी आढळल्याने त्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आलं. आरपीएफ मुख्यालयातून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

आरपीएफ जवानांवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना त्यांच्याकडूनच असं वर्तन झाल्याने रेल्वे पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत होता. मात्र पोलिसांवरील विश्वास ढळू नये, यासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचं आरपीएफच्या वतीने सांगण्यात आलं.